महाड : मोठ्या गाजावाज्यात सुरू करण्यात आलेला ‘आपला दवाखाना’ आज गंभीर अवस्थेत पोहोचला आहे. केंद्राच्या ठिकाणी ना पिण्यासाठी पाणी आहे, ना वीजपुरवठा, आणि डॉक्टरही आपली नेमणूक सोडून निघून गेले आहेत. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून हे आरोग्य केंद्र अक्षरशः बंद अवस्थेत आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘आपला दवाखाना’ या संकल्पनेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी अनेक ठिकाणी केंद्रे मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आली. महाडमध्ये मे २०२३ मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले, मात्र ऑगस्ट २०२३ पासून विविध कारणांमुळे दवाखाना कोसळला.

महाडच्या मुख्य बाजारपेठेतील जुनी भाजी मंडई परिसरात महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यात हे केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, दवाखाना सुरू झाल्यापासून तेथे पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. रुग्ण तपासणी व पॅथॉलॉजिकल चाचण्या या ठिकाणी होत असल्याने पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, पाण्याचा कोणताही पुरवठा नसल्याने कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागते. स्वच्छतागृहांनाही पाणी नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
याशिवाय, उद्घाटनावेळी तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला होता. मात्र फक्त दोन दिवसांतच वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर आजतागायत वीज नसल्याने लॅब तपासण्यांवर परिणाम झाला आहे.
महाडमध्ये सुरू झालेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात दोन डॉक्टर, एम.पी.डब्ल्यू, ए.एन.एम., सुरक्षा रक्षक आणि एक नर्स अशा पाच पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, नियुक्त डॉक्टर केवळ महिनाभरातच केंद्र सोडून मूळ गावी रुजू झाले. यासंदर्भात, ११ महिन्यांच्या करारामध्ये अशी शिथिलता असल्याचे महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बावडेकर यांनी स्पष्ट केले.
बिंदू नामावलीमुळे नवीन पदभरती न झाल्याने केंद्रातील बहुतांश पदे रिक्त पडली आहेत. डॉक्टरांच्या रिक्त पदांसाठी प्रशासनाने पत्रव्यवहार सुरू केला असला तरी, सध्या महाडमधील ‘आपला दवाखाना’ ओस पडला आहे.
महाड शहरातील काजळपुरा भागात दुसरे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झाले आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या सभागृहाच्या कामामुळे अजूनही केंद्र सुरूच झालेले नाही. त्यामुळे शासनाने मोठ्या घोषणांसह सुरू केलेले आरोग्य केंद्र थोड्याच काळात कोमात गेले आहे.
महाडमध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राची स्थापना केवळ औपचारिक ठरली आहे. पाणी, वीज, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सरकारच्या ‘आपला दवाखाना’ संकल्पनेचा फज्जा उडाला आहे.