पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’ अशी घोषणा केल्यावरून आम आदमी पार्टीने जोरदार टीका केली आहे. “ही घोषणा केवळ शब्दांची नाही, तर महाराष्ट्रावर चालवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक आणि आर्थिक बुलडोझर राजकारणाचा पुढचा टप्पा आहे,” असा आरोप आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
किर्दत म्हणाले, “सत्तेसाठी ‘खोके-बोके’ राजकारण करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाने आता महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट आघात करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत ‘जय गुजरात’चा नारा देणं हे मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. सध्या राज्यात हिंदी सक्तीवरून मराठी समाज अस्वस्थ आहे, मराठीचा अपमान सहन करत नाहीये, अशावेळी जाणीवपूर्वक मराठी अस्मितेला डिवचण्याचा हा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “हे केवळ सांस्कृतिक आक्रमण नाही, तर यामागे महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प, गुंतवणूक गुजरातकडे वळवण्याचं आर्थिक षडयंत्र आहे. शिंदे सरकार हे या षडयंत्राला पाठबळ देत असून, त्यांची भूमिका सत्तेसाठी लाचार व आत्मसन्मानविहीन आहे.”
आप प्रवक्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ गीतातील ओळी उद्धृत करत शिंदे यांच्यावर शरसंधान साधलं. “भीती न आम्हा मुळी तुझी मिंध्यांच्या एकनाथा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा… जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!”
या घटनेवरून राज्यात राजकीय तापमान वाढण्याची शक्यता असून, विरोधकांनीही यावर सरकारला जाब विचारण्याचे संकेत दिले आहेत.