मुंबई –राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” या अभिनव योजनेला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, केवळ १५ दिवसांत ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते म्हणाले, “शाळा-महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले असून, या कालावधीत १ लाख ६१ हजार २०० विद्यार्थ्यांना एसटी कर्मचारी त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करत आहेत.”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ३ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनींना मोफत एसटी पास दिले गेले आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना एसटी पाससाठी आगारात जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता शाळा/महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थेत पास वितरित केले जात आहेत.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता शालेय एसटी फेऱ्या कोणत्याही कारणाने रद्द होऊ नयेत, असे स्पष्ट निर्देशही सरनाईक यांनी दिले. आदिवासी भागात अनेक ठिकाणी एकमेव बसफेरीवर विद्यार्थी अवलंबून असतात. त्यामुळे आगारप्रमुखांनी अशा फेऱ्या नियमित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.
१६ जूनपासून एसटी प्रशासनाने “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्व शाळा आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास आगाऊ सूचना दिल्या गेल्या होत्या, यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा आला नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.