मुंबई –विधानसभेतील अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीवर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले, जेव्हा तालिका सभापती चेतन तुपे यांनी अध्यक्ष आसनावरून राजकीय टिप्पणी केली. यावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार संतप्त होत म्हणाले, “पदाची एक गरिमा असते, ती राखली गेली पाहिजे.”
शुक्रवारी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना काही आमदार अनुपस्थित होते. यावर टिप्पणी करत तालिका सभापती चेतन तुपे यांनी अनुपस्थित आमदारांवर टीका केली. याला आक्षेप घेत वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत विरोध केला. “सभागृह सुरळीत चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. मंत्री आणि संबंधित अधिकारी अनुपस्थित असताना फक्त आमदारांवर टीका करणं योग्य नाही. अध्यक्षपदाचा वापर राजकीय हेतूसाठी करणे सभागृहाचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.
वडेट्टीवार यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगत, “सभागृहातील प्रथा, परंपरा आणि संकेत पाळले गेले पाहिजेत,” असा निर्वाळा दिला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आश्वासन दिले की, “संविधानाच्या चौकटीत राहूनच पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करावे. अध्यक्ष आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल.”
दरम्यान, या वादामुळे आजच्या सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.