मुंबई : “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या राज्यासाठी भूषणावह नाहीत,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आणि याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली.
ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य केंद्रावर विकले, पण वर्षभर झाले तरी पैसे नाहीत. बँका व्याज आकारत आहेत, शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही, आणि तो सावकाराकडे जातो.” लातूरच्या शेतकऱ्याने स्वतःला औताला जुंपल्याची घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही ते म्हणाले.
गोंदियातील गो-हत्याबंदी कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे बैल पोलिसांनी पकडून गोरक्षकांच्या स्वाधीन केल्याची घटना उघड करत, हे तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “सरकारने अवकाळी पावसानंतर नुकसानभरपाईची केवळ घोषणाच केली, पण प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. ८२,९९९ शेतकऱ्यांचे नुकसान असूनही सरकारने फक्त १०० कोटींची मदत जाहीर केली – ही अत्यंत तुटपुंजी आहे.”
शेतपंपाची वीज तोडणे, दूध उत्पादकांना कमी दर मिळणे, आणि खते-बियाण्यांवर १८% जीएसटी लावणे याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. “अंबानींसाठी ४८,००० कोटी माफ करता, पण शेतकऱ्यांसाठी कमिटी बसवता – ही दुजाभावाची वृत्ती थांबवा,” अशी मागणी करत, “शेतकरी तुमचे जुमले माफ करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.