मुंबई : “मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा आत्मा आहे. तिच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा अखंड सुरू राहील,” असा ठाम निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज व्यक्त केला.
मराठी माध्यमावर हिंदी लादण्याचा प्रयत्न हा केवळ भाषिक अन्याय नाही, तर सांस्कृतिक गुलामगिरीकडे नेणारा धोका आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती करणारे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असले, तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही हिंदी थोपवण्याच्या नव्या डावाची नांदी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
“ही लढाई केवळ आंदोलनापुरती मर्यादित नाही, तर तो लोकशाही मूल्यांचा दीर्घकालीन संघर्ष आहे,” असे सांगत सपकाळ यांनी मराठीप्रेमी नागरिक, अभ्यासक व सामाजिक संघटनांचे अभिनंदन केले. काँग्रेस पक्ष मराठी भाषेच्या सन्मानासाठी सदैव सज्ज राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.