मुंबई
राज्यात अधिकाधिक परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचे शिष्टमंडळ दावोस आर्थिक परिषदेसाठी जाणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून यंदा राज्यात सुमारे दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात येणार असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.
गद्दारी केली अन् थेट दावोसवारी…
याआधी गद्दारी करणाऱ्यांना गुवाहाटीला घेऊन गेले होते, आता गद्दारी केली तर दावोसला घेऊन जाणार आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. दावोसला मुख्यमंत्र्यांसह ५० जणं जाणार आहेत. यात उद्योगमंत्री, एक खासदार, माजी खासदार यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलं यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
दावोसच्या दौऱ्यासाठी परराष्ट्रमंत्री आणि केंद्रीय वित्त खात्याची परवानगी लागते. ५० पैकी १० जणांची परवानगी मागितली असून ती केंद्राने दिली आहे. पण इतरांचं काय? ५० जणांची परवानगी मागितली आहे का? हे सर्वजण राज्य सरकारच्या खर्चाने जाणार, केंद्राच्या की स्वत:च्या खर्चाने जाणार आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.