मुंबई
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरलं. या पत्रकार परिषदेत कोस्टल रोडबरोबरच महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोस्टल रोडचं काम आमचं आहे, उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं. मात्र अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही तरीदेखील केवळ निवडणुकांसाठी उद्घाटनाचा घाट घातला जात आहे, अस घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्सची जागा गिळंकृत केली जात आहे. येथे घोड्यांचा तबेला बांधून दिला जाणार आहे. यासाठी पालिका १०० कोटींचा खर्च करणार आहे. येथे घोड्यांचे तबेले बांधले जाणार आहेत. घोडे श्रीमंतांचे मग जनतेचा पैसा का वापरला जातोय? रेसकोर्सच्या जागेविषयी बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मुंबईचा रेसकोर्स हा केवळ रेसकोर्स नाही तर २२६ एकरच्या मोकळ्या जागेत हजारो मुंबईकर चालायला, धावायला, लाफ्टर क्लब चालवतात, विविध मोठमोठे कार्यक्रम होतात. सामान्य नागरिकांसाठी खुली असलेली एकमेव जागा ही रेसकोर्स आहे, असं ही ते यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले…
- रेसकोर्स खाली भूमिगत कार पार्क. त्याकरिता कमीतकमी ४ वर्षांसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम होईल. रेसकोर्सच्या खाली भूमिगत कार पार्कची गरज नाही, कारण कोस्टल रोड बनवताना, आम्ही कोस्टल रोडवर २००० कारसाठी आधीच भूमिगत कार पार्कची तरतूद केली आहे.
- रेसकोर्सवर घोड्यांचे तबेले बनवण्याकरिता BMC (मुंबईकरांच्या कराच्या पैशातून) १०० कोटी खर्च करणार आहेत. RWITC च्या तबेल्यांवर आपण मुंबईकर म्हणून १०० कोटी का खर्च करावेत? ज्यांचा हा छंद आहे, खेळ आहे आणि जे घोडे विकत घेऊ शकतात, त्यांनी तबेले बांधण्यासाठी खर्च करावा. आमच्या कराचा पैसा का?
- जवळच असलेल्या SRA योजनेत घरे दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही SRA योजना कोणती? बिल्डरला मोफत अतिरिक्त एफएसआय दिला जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
- या “मोफत अतिरिक्त FSI” चा फटका BMC च्या तिजोरीवर-मुंबईकरांच्या कराच्या पैशावर पडणार आहे. राज्यातील भाजप प्रायोजित सत्ताधाऱ्यांच्या आवडत्या कंत्राटदार (अंडरग्राउंड कार पार्कसाठी) आणि बिल्डरच्या माध्यमातून (फ्री एफएसआय) आयुक्त निव्वळ फसवणूक करत आहेत.
- RWITC अजूनही मैदानाचे विभाजन करण्यास इच्छुक असल्यास संपूर्ण जागा खेळाचे मैदान असल्याचे जाहीर करा व मैदान इतर ऍक्टिव्हिटीजसह घोडेस्वारीचे उपक्रमही चालू ठेवा. लोकांसाठी नव्हे तर कंत्राटदार मंत्र्यांसाठी (सीएम) काम करणाऱ्या आयुक्तांना एक सल्ला. ते म्हणाले की, रेसकोर्स आता सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. वीकेंडला आणि सुटीच्या दिवशी फिरायला बाहेरगावी जाण्याऐवजी त्यांनी मुंबईतच राहून रेसकोर्सवर एखादा फेरफटका मारावा, तिथे सर्वसामान्य मुंबईकर मोकळा श्वास घेताना त्यांना दिसतील.