नागपूर
किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे दूधदराचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. आज सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हरिभाऊ बागडे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत दूधदर प्रश्नावर लक्ष वेधले. दूध अनुदान थेट शेतकऱ्यांना (When will farmers get direct subsidy for Milk) मिळावे व दूध अनुदानाची घोषणा तत्काळ करावी ही किसान सभेची व राज्यातील शेतकऱ्यांची मागणी सर्वांनी सभागृहात अधोरेखित केली.
परिणामी अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदानाची घोषणा होईल असे दुग्धविकास मंत्र्यांना सांगितल्याचं समोर आलं आहे. किती अनुदान देणार याबाबत पुन्हा खुलासा विचारला असता स्पष्ट उत्तर मिळाले नाही. याशिवाय भावफरक जितका असेल किमान इतके अनुदान सरळ शेतकऱ्यांना द्यावे असे सभागृहात मांडण्यात आले. भेसळ रोखण्यासाठीचे अधिकार दुग्धविकास विभागाला द्यावेत ही किसान सभेची आग्रही मागणी होती. ही मागणी मान्य झाल्याचे दुग्धविकास मंत्र्यांच्या उत्तरावरून स्पष्ट झाले आहे.
मिल्कोमिटर व वजन काट्यात होणारी लूटमार रोखण्याबाबत मात्र अद्यापही उत्तर मिळालेले नाही. माकपचे आमदार विनोद निकोले यांच्या मार्फत याबाबत पाठपुरावा करत आहोत. पशुखाद्याचे भाव कमी करण्याबाबत मात्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. जयंत पाटील यांनी याबाबतची स्पष्ट टिप्पणी केली. सरकारने पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी ठोस उपाय करण्याची आवश्यकता आहे.