मुंबई
अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करीत स्वत:ची वेगळी चूल मांडली, यावर माजी खासदार आणि दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. पुन्हा एकदा शालिनीताई यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार गटाकडून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान शालिनीताई यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. पुढच्या चार महिन्यात अजित पवार तुरुंगात जातील, त्यामुळे त्यांना निवडणुकीलाही उभं राहता येणार नाही. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे. मुंबई तकशी त्या बोलत होत्या.
अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी
शरद पवार आणि अजित पवार यांची तुलना करता येऊ शकत नाही. अजित पवारांनी स्वार्थासाठी पक्ष फोडला. तर शरद पवार बाहेर पडणार असल्याचं ते वसंतदादा पाटील यांना सांगून गेले होते. शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या बचावासाठी केलं. त्यामुळे या दोघांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवारांनी विश्वासघात केला. अजित पवारांसोबत गेलेले मंत्री शरद पवारांच्या नावावर निवडून आले आणि स्वत:ची वेगळी चूल मांडली.