X: @therajkaran
मुंबई: राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी करून भाजपशी (BJP) हात मिळवणी केलेल्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) आता अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh )आगामी लोकसभेबरोबरच विधानसभा (Vidhansabha) निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबतची बैठक देवगिरीवर पार पडली.
राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गट पहिल्यांदाच राज्याबाहेर निवडणूक लढवणार आहे. काल रात्री मुंबईत अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी अजित पवार आणि प्रफुल पटेलांची भेट घेतली. या राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशातून विधानसभा निवडणूक लढवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी अजित पवार गट सक्रिय झाला आहे. तेथील स्थानिक नेतेही निवडणुकीसाठी आग्रही आहेत. पण महायुतीतील घटक पक्ष असल्याने अजित पवार गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभेसाठी भाजपने अरुणाचल प्रदेशातून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू (Kiran Rijiju) यांना उमेदवारी दिली आहे. तरीही लोकसभेसाठी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रीय पक्षासह इतर राज्यात पक्ष घट्ट करण्यासाठी अजित पवार गट कामाला लागला आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे (NCP) काटे कोणाला टोचतात हे लवकरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्याबाहेर पक्ष विस्तारण्याचे धोरण स्वीकारल्याने भाजपला पण अडचण होऊ शकते.