अकोला : प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आता काँग्रेसने त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. मविआमधील चर्चा फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र चूल मांडली. यामुळे मविआतील मतांचं विभाजन होईल हे निश्चित. मात्र असं असलं तरी अकोल्यातून काँग्रेसकडून सोमवारी रात्री डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर याना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मविआबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर चर्चा करीत होते. मात्र जागावाटपावर तोडगा निघू शकला नाही. शेवटी प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत वंचितने एकूण २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.
डॉ अभय पाटील २०१९ मधेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पाटील तेव्हा शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी होते. मात्र अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही तो न स्वीकारल्याने त्यांना उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही. महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली गेली आहे. ते माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत. आता काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिल्याने, निवडणूक रंगतदार होणार आहे.अभय पाटील हे एमबीबीएस ऑर्थोपेडीक सर्जन असून काँग्रेसच्या अकोलाचे जिल्हाध्यक्ष, तर महाराष्ट्र काँग्रेस समितीचे महासचिव या पदी काम करतात.
आतापर्यंत अभय पाटील यांनी 50 हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते लायन्स क्लॅबचे माजी अध्यक्ष आहेत. अकोला आणि वाशिममध्ये मराठा क्रांती मोर्चा संयोजन त्यांनी केले होते. ते अकोला वेद आणि संस्कार स्कूलचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी बाळापूर व सोनखास येथे ग्रामीण भागात शाळांची स्थापना केली आहे.