मुंबई: मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत ‘अक्षरभारती’ या भारतीय सुलेखन सौंदर्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री आशीष जैसवाल, नवनीत प्रकाशनचे अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव, तसेच गॅलरीच्या मिस मेनन उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अच्युत पालव यांनी अक्षरकला जोपासून ती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. लिपी आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून अच्युत पालव यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाल्याचा मला अभिमान आहे.”
नवनीत प्रकाशनचे अनिल गाला म्हणाले, “पालव यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून लिपीला पुढे नेण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला आहे, आणि आम्ही त्यांना यामध्ये पाठिंबा दिला.”
पद्मश्री अच्युत पालव यांनी मराठी भाषेसाठी स्वतंत्र संग्रहालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांनी भारताच्या लिपी परंपरेला जपणे आणि प्रसारित करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
‘अक्षरभारती’ पुस्तक:
पुस्तकात ब्राह्मी, खरोष्ठी, मोडी, देवनागरी, उर्दू, गुरुमुखी, कन्नड यांसारख्या प्राचीन व आधुनिक लिप्यांचा कलात्मक आढावा घेतला असून, देशातील ३६ सुलेखनकारांची २३६ अक्षरचित्रे समाविष्ट आहेत. अभ्यासक श्री गणेश देवी, डॉ. संतोष क्षिरसागर, आणि अन्य लेखकांचे लेखही यात आहेत.
प्रदर्शन:
जहांगीर आर्ट गॅलरीत २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहील. विद्यार्थी आणि रसिकांनी लिप्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन अच्युत पालव यांनी केले आहे.