कल्याण : कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी नदीच्या पुलाला समांतर नवीन उड्डाणपूल बांधण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सध्याचा पूल 30 वर्षांपूर्वी बांधला गेला असून तो अतिशय अरुंद आहे. गेल्या तीन दशकांत या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आमणे गावात बांधल्या जाणाऱ्या इंटरचेंजमुळे वाहतुकीची तीव्रता आणखी वाढेल.
गेल्या काही वर्षांत पूल तडे गेल्याने त्याची स्थिती चिंताजनक झाली आहे. हा पूल फक्त कल्याण-पडघा मार्गासाठीच नव्हे, तर परिसरातील गावांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. समृद्धी महामार्ग इंटरचेंज सुरू झाल्यानंतर या पुलावरील वाहतुकीचा बोजा अधिक वाढेल, त्यामुळे 6 किंवा 8 पदरी प्रशस्त पुलाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.