देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात
गरज भासल्यास केंद्राकडे मुदतवाढ मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई : राज्यातील 7,64,731 शेतकऱ्यांपैकी 3,69,114 शेतकऱ्यांकडून 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली असून, ही खरेदी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
खरेदी प्रक्रियेचा आढावा
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी खरेदी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. खरेदी झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल यासाठी कार्यवाही सुरू आहे. 31 जानेवारी 2025 पर्यंत खरेदी सुरू राहणार असून या कालावधीत खरेदीच्या आकडेवारीत आणखी वाढ होईल. गरज भासल्यास केंद्र सरकारकडे खरेदीची मुदतवाढ मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खरेदी केंद्र आणि प्रक्रिया
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीद्वारे 562 खरेदी केंद्रांवर 15 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेची मुदत एकदाच वाढवण्यात आली होती. सुरुवातीला 12 जानेवारी 2025 पर्यंतची खरेदी मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या विनंतीनंतर 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवून घेतली आहे.
महाराष्ट्राची आघाडी
देशातील सहा प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक 7,81,447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे. इतर पाच राज्यांनी मिळून 18,68,914 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली असून त्यातील मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे.
राज्यात नांदेड जिल्ह्यात 57,528 शेतकऱ्यांकडून सर्वाधिक 1,00,290 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात 29,764 शेतकऱ्यांकडून 60,989 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करत खरेदी प्रक्रिया गतीने सुरू असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
हमीभाव आणि उत्पादनाचे उद्दिष्ट
केंद्र सरकारने 2024-25 साठी सोयाबीनसाठी हमीभाव 4,892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे, जो मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा 292 रुपये अधिक आहे. या हंगामात राज्यात सोयाबीन लागवड क्षेत्र 50.51 लाख हेक्टर असून उत्पादन 73.27 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने पीएसएस अंतर्गत 14,13,270 मेट्रिक टन (19.28 टक्के) खरेदीसाठी मंजुरी दिली असल्याची माहिती मंत्री रावल यांनी दिली.