मुंबई: ठाण्यातील मेट्रो ४ (वडाळा–कासारवडवली) आणि मेट्रो ४ अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या मेट्रो ११ शी जोडल्या जाणार असून, एकूण ५८ किमीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका पुढील वर्षअखेर प्रवाशांसाठी खुली होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ४ व ४ अ च्या प्राधान्य विभागावर (गायमुख जंक्शन–घोडबंदर रोड–कासारवडवली–विजय गार्डन) तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, घाटकोपर–मुलुंड–गायमुख या ३५ किमी लांबीच्या मार्गिकेत ३२ स्थानके असून प्रकल्पावर सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागेत डेपो उभारले जात आहेत. या मार्गिकेमुळे पूर्व-पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबई शहर यांना थेट जोडणी मिळणार आहे. मेट्रोचे सर्व टप्पे सुरू झाल्यावर दररोज १३ लाखांहून अधिक प्रवासी या सुविधेचा लाभ घेतील आणि रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ५८ किमी लांबीचा हा एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प हा भारतातील पहिलाच असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तो महत्त्वाचा ठरेल.
या मेट्रो ट्रेनमध्ये BEML चे ६-डब्यांचे सेट, अत्याधुनिक ट्रेन कंट्रोल सिस्टम, आपत्कालीन संपर्क सुविधा, स्वयंचलित अग्निशमन शोध, अडथळा शोध यंत्रणा, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली आदी सुविधा असतील.