पुणे
शिवनेरीपासून अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली होती. आज बारामतीत शेतकरी आक्रोश मोर्चाला संबोधित करताना अमोल कोल्हेंनी अजित दादांवर नाव न घेता हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले, वाघ जेव्हा जंगलात फिरतो तेव्हा तो जंगलाचा राजा असतो, मात्र तोच वाघ जेव्हा सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला वेदना होतात. एकेकाळी या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता, मात्र आज त्या वाघाला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागत आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत, तेव्हा..असं म्हणत त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता निशाणा साधला.
दादा विरूद्ध कोल्हे
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिलं होतं. शिरूरच्या जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार, म्हणजे दाखवणार अशी गर्जना अजित पवारांनी केली आहे. अमोल कोल्हेंनीही याला प्रत्युत्तर देत दादांनी शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रासमोर मांडून त्यांना न्याय द्यावा असं आवाहन केलं. अजित दादांच्या गर्जनेनंतर राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या शिरूर मतदारसंघात शऱद पवार गटानेही तोफ डागली आहे.