नवी दिल्ली
संसदेवर बुधवारी चौघांनी केलेल्या हल्ल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेश सुरू असलेल्या विधानमंडळ परिसरात आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. काल संसदेत हल्ला करणाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील लातूरमधील अमोल शिंदे नावाच्या एका तरुणाचा समावेश आहे.
संसदेची बातमी समोर आल्यानंतर अमोलच्या गावात खळबळ उडाली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील अमोल असं का वागला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी अमोलच्या घराचा तपास केला आणि कुटुंबातील सदस्यांशी चौकशी केली. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शिंदे पोलीस भरतीची तयारी करीत होता. तो सकाळी अनेक किलोमीटर धावायचा. दिवस-रात्र अभ्यास करायचा, मात्र त्याची निवड झाली नाही. नोकरी नसल्यामुळे तो त्रस्त होता. अमोलबाबतचे वृत्त समोर येताच त्याच्या आईला जबरदस्त धक्का बसला आहे.
कोण आहे अमोल शिंदे
अमोल हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावचा आहे. तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. तो शेतात काम करतो. तो मातंग समाजाचा असून मराठा आरक्षणाशी त्याचा संबंध नाही. अमोलचे आई-वडील भूमीहीन शेतमजूर आहेत. ते इतरांच्या शेतात काम करतात.
दोन आठवड्यांपूर्वी सोडलं घर
आरोपी अमोलच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, अमोलने दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीला जात असल्याचं सांगून घर सोडलं होतं. मात्र दिल्लीला जाण्यामागील कारण त्याने सांगितले नव्हते. अमोल कोणत्या राजकीय किंवा सामाजिक संघटनेशी संपर्कात होता का, याचाही तपास केला जात आहे.