सिद्धेश कदम यांची एमपीसीबी च्या अध्यक्षपदी नियुक्ती
X: @therajkaran
येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे ज्येष्ठ ,आक्रमक आणि फायर ब्रँड नेते रामदास कदम यांची नाराजी महायुतीला भोवू नये यासाठी येनकेन प्रकारे कदमांची समजूत काढण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धेश कदम यांची अचानकपणे एम पी सी बी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एक पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. स्वतः रामदास कदम शिवसेनेच्या नेतेपदावर आहेत. तर स्वतःच्या कामातून दापोलीसह , मुंबईत देखील ठसा उमटवणारे सिद्धेश हे शिवसेनेचे राज्य सचिव तथा मुंबईचे संपर्क प्रमुख म्हणून काम बघत असतात. राजकारणात तळमळीने काम करणारे सिद्धेश , हे क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात देखील हिरिरीने भाग घेत असतात. त्यांच्याच पुढाकाराने ९ व १० मार्च रोजी अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात महाराष्ट्र श्री आणि मुंबई श्री अशा भव्य स्वरूपात शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबईतील उपनगरे , खास करून पश्चिम मुंबईतील उपनगरे येथील सिद्धेश यांचे काम निश्चितच दखल घेण्याजोगे आहे. दापोलीत आपले बंधू आमदार योगेश कदम यांच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा सिंहाचा वाटा असतो. या सगळ्याचे फलित म्हणून आज त्यांच्यावर शिवसेनेकडून अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे एमपीसीबीचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
पण या नेमणूकीला एक राजकीय दबावाची किनार देखील आहेच. फटकळ समजल्या जाणाऱ्या रामदास कदम यांचे मूल्य आणि उपद्रव मूल्य या दोन्हींची जाणीव शिवसेनेसह भाजपला देखील आहेच. शिवसेनेतील महाफुटीनंतर उद्धव ठाकरे यांना अत्यंत आक्रमकपणे प्रत्येक भाषणात , पत्रकार परिषदेत अंगावर घेण्यात रामदास कदम कायमच आघाडीवर होते , आहेत , हे कोणालाच नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत समजल्या जाणाऱ्या आमदार अनिल परब यांचा दापोलीत असणारा वादग्रस्त साई रिसॉर्ट यांचे प्रकरण भाजपच्या किरीट सोमय्यांना सरवींग प्लॅटर म्हणून सर्व कागदपत्रांसह देण्यात रामदास कदम यांचाच छुपा आशीर्वाद होता अशी खमंग चर्चा तेंव्हा राज्यभर सुरू होती. कदमांनी त्याचा इन्कार करून झाल्यानंतर ही दापोलीच्या अनधिकृत रिसॉर्टचा विषय निघताच आजही परब यांच्यामागे लागलेल्या शुक्लकाष्ठाला कदम यांची खेळीच जबाबदार आहे असे बोलले जाते.
भाजप शिवसेनेला गृहीत धरतोय , भाजप याएकाच पक्षाला राज्यात जिवंत राहून इतर पक्ष संपवायचे आहेतका , कुठल्याही परिस्थितीत रायगड आणि रत्नागिरी हे दोन लोकसभा मतदार संघ शिवसेना सोडणार नाही , अशा अनेक दबावतंत्राच्या खेळी रामदास कदम गेले काही महिने खेळत आहेत. कदमांनी जास्त काळ नाराज राहणे हे निवडणुका तोंडावर असताना भाजप शिवसेना या दोघांना परवडणारे नाही , ही समज दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडे आहेच , त्यामुळे हीच नाराजी दूर करण्याचा एक रामबाण उपाय म्हणून देखील सिद्धेश कदम यांच्या एमपीसीबीच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीकडे बघितले जात आहे.