महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी”!

X : @NalawadeAnant

मुंबई :  मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये (e-Shivneri ST Bus) प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे.  प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा एस. टी. महामंडळाचे नूतन अध्यक्ष भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची ३०४ वी बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका (Shivneri Sundari) नेमण्यास मान्यता देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतील स्व.आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर “आनंद आरोग्य केंद्र” (Anand Arogya Kendra) या नावाने स्वतंत्र दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबर आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.मी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयाची असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

मूल व धारणी येथे नवे आगार निर्माण होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.

महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

आता एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना (Self Help Group) आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात