Twitter : @NalavadeAnant
मुंबई
विधिमंडळातील विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य तसेच महामंडळांवरील नियुक्त्याबाबत मंगळवारी झालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. याद्या तयार करण्यात आल्या असून तिन्ही पक्षांतर्फे राज्यात लवकरच महासंवाद दौरा (Maha Samvad Tour) करण्यात येणार असल्याची घोषणा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
महायुती समन्वय समितीची बैठक आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, खा. सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे, खा. राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड, आशिष कुलकर्णी, समीर भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आ. शेलार म्हणाले की, स्वाभाविकता ही बैठक काही अंतरानंतर सातत्याने होणाऱ्या आमच्या बैठकीचाच एक समन्वयाचा भाग होती. आजचा प्रमुख विषय विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी विधानसभा कामकाजातील लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या या विधानसभा आणि विधान परिषदेतल्या ज्या विविध समित्या आहेत, त्या समितीवर सदस्यांची नावे त्या पदांवर अध्यक्ष म्हणून तिन्ही पक्षाचे नेते यांच्या नावांबाबत आज चर्चा झाली. त्यांचा अंतिम निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांचा असतो. त्यांच्याकडे ही सगळी नावं आज सुपूर्द केली जाईल आणि त्या समित्या तातडीने घोषित होतील, असेही शेलार यांनी यावेळी नमूद केले.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रमुख नेते राज्याचा प्रवास करणार असून पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, ते विभागीय दौरा करतील. जिल्ह्यातील दौरा अन्य नेते करतील आणि विधानसभा मतदारसंघापर्यंत सुद्धा तिन्ही पक्षांचे नेते जाणार आहेत. कोणता नेता कुठल्या विधानसभेत जाईल, कोण कुठल्या जिल्ह्यात जाईल, कोण कुठला विभागाचा नेतृत्व करेल, याबद्दलचा एक रिपोर्ट आम्ही आजच्या बैठकीत तयार केला आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी हा रिपोर्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम घोषित करू, असेही आ.शेलार यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यभर हा “महासंवाद” दौरा करण्यात येणार आहे. तसेच ज्या निवडणुका आता घोषित झाल्या आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतची सुद्धा प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. अंतिम निर्णय तीनही नेते करतील. या बैठकीमध्ये केवळ विधानसभा, विधान परिषदेच्या समित्याच नाही, तर महामंडळाबाबतीतही तिन्ही पक्ष आणि आमच्या सहकारी पक्षांकडून येणारे सदस्य या सगळ्यांच्या सदस्य संख्येचा निर्णय, सोबत त्या महामंडळांवर अध्यक्ष म्हणून कुठल्या पक्षाचे नेते असतील, याबाबत सर्वसमावेशक अशी एकदिलाने चर्चा आम्ही आज केलेली असून तोही प्रस्ताव अंतिमतः तिन्ही नेत्यांसमोर आम्ही पाठवला आहे, अशी माहितीही आ. शेलार यांनी दिली.
दरम्यान, महामंडळ,समितीच्या वाटपाची संख्या, टक्केवारी याची चर्चा महत्त्वाची नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सर्व घटकांना न्याय मिळावा, सर्व पक्षातील सदस्यांना त्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी, याचे स्वरूप डोळ्यासमोर घेऊन हा फार्मूला ठरला आणि त्याचा अंतिम स्वरूप तिन्ही नेते देतील, असेही शेलार यांनी सांगितले.