X: @therajkaran
मुंबई: महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेत माजी मुख्यमंत्री व माजी ज्येष्ठ काँग्रेस नेते पण सध्या भाजपवासी होऊन राज्यसभेचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांनीच जाणूनबुजून घोळ घातल्याने काँग्रेसला मनासारख्या जागा मिळू शकल्या नाहीत, या राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आरोपानंतर खा. अशोक चव्हाण यांनीही तितक्याच तीव्रतेने काँग्रेसवर पलटवार करत विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शुक्रवारी येथे थेट निशाणा साधला.
आज मुंबईत माध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, जागावाटपाच्या चर्चा होत असताना जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पाडून घ्यायच्या इतपत त्यांचा अभ्यास नाही. परंतू बैठकीत बसून फक्त गप्पा मारायच्या आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये जावून भोजनावळी झोडायच्या या त्यांच्या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे हा आताचा परिणाम दिसत आहे. खरं सांगायचं तर यांच्याकडे मुत्सद्देगिरी व व्यवहार चातुर्य याचाच अभाव आहे. त्यांना जागावाटपात कधीच रस नसल्याने आता त्यांच्या वाट्याला निराशाच आली आहे, अशा काहीशा तिखट शब्दात त्यांनी काँग्रेस नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
खा. अशोक चव्हाण यांनी हेही स्पष्ट केले की, काँग्रेसमधील नेत्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचे मित्रपक्ष उध्दव ठाकरे व शरद पवार यांनी त्यांना न विचारात घेताच परस्पर दक्षिण मध्य मुंबई, सांगली व भिवंडीची जागा आपापल्या पक्षासाठी घोषित केल्या. परंतू एक मात्र मी सांगू शकतो की मी काँग्रेसमध्ये असताना व जागावाटप समितीचा प्रमूख या नात्याने पक्षाला चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी खूप आटापिटा केला. इतकेच काय भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा यासाठीही प्रसंगी टोकाची भूमिका घेतली. हिंगोली आणि सांगलीचीही जागा सोडण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचवेळी खुद्द मुंबईतही पक्षाला किमान दोन जागा तरी मिळाव्यात यासाठी मी अखेरपर्यंत आग्रही होतो. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसचे मुंबईत नाव घेण्याजोगे अस्तित्व आहे. परंतू या नेत्यांचा डोळ्यादेखत सर्वांना गाफील ठेवून उध्दव ठाकरे यांनी जागावाटपात आघाडी घेतली, असाही गंभीर आरोप त्यांनी काँग्रेस नेत्यांवर केला.
खरंतर जागावाटपात उध्दव ठाकरे व शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचा सत्यानाशच केला. त्यामूळेच आज घडीला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की, प्रत्यक्ष निवडणूकीत हेच कार्यकर्ते इमानदारीने मित्र पक्षांच्या उमेदवारांचे मनापासून कामच करणार नाहीत. आता तसे बघायला गेले तर काँग्रेस सोडून दीड ते दोन महिने होत आले तरी ते माझी दखल घेत माझ्यावर आरोप करतात, याचाच अर्थ पक्षात मी दखलपात्र होतो ना…. असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.