मुंबई : राज्यातील आरोग्य उपकेंद्रांपासून ते तृतीय व चतुर्थ दर्जाच्या रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने व्यापक प्रकल्प राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘मिशन’ स्वरूपात करण्यावर भर दिला.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण जाहीर केले असून, त्याच धर्तीवर राज्यातही कर्करोग निदान व उपचारासाठी कार्यपद्धती निश्चित केली जावी. यात केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आदी उपचारांचा समावेश असावा आणि निश्चित कालमर्यादेत अंमलबजावणी व्हावी.
वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची आवश्यकता
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नव्याने सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत संलग्न असलेल्या सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता अपुरी असल्यास, त्या जिल्ह्यांत स्वतंत्र रुग्णालये उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागांनी एकत्रितपणे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा.
धाराशिव येथे नव्या रुग्णालयाची घोषणा
धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानंतर निश्चित कालावधीसाठी शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाचीही तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत उपस्थित मान्यवर
बैठकीस मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त राजीव निवतकर आदी अधिकारी उपस्थित होते. आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी निशांत जैन दूरसंचार प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
राज्यातील प्रकल्पांची माहिती
• अलिबाग आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय सामान्य रुग्णालयांचे बांधकाम सुरू
• अमरावती, वाशिम आणि धाराशिव येथील रुग्णालये निविदा प्रक्रियेत
• गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ हे ‘हब’ आणि सात ‘स्पोक’ केंद्रे प्रस्तावित
• आरोग्य व्यवस्थापनासाठी माहिती प्रणाली विकसित
• सातारा, चंद्रपूर आणि सर जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी उपकरणांची खरेदी
• अवयवदान आणि प्रत्यारोपण संस्थांची उभारणी प्रस्तावित.