X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) स्थानिक पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असो किंवा महायुती (Mahayuti), यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत.
आठवले यांनी राज्यातील शिर्डी (Shirdi), सोलापूर (Solapur) आणि छत्रपती संभाजीनगर (Chatrpti Sambhajinagar) या मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे चेंबूर येथे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवलेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा व्यक्त करत आपल्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी शिर्डी, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर मतदार संघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. परंतु, यांतील शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवर आधीच शिवसेना शिंदे (Shivsena Shinde) गटाकडून तर सोलापूर लोकसभेवर भाजपाकडून (BJP) दावा करण्यात आला आहे. आता रिपाइंने दावा केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत.
रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एनडीएचा आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडून आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा (RPI) संकल्प आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावा, असे रामदास आठवले यांच्याकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. आगामी काळात रिपाइंला त्यांनी दावा केलेल्या जागा मिळाल्या नाही तर, त्यांच्याकडून लोकसभेबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात येतो? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.