महाड : – महाड-विन्हेरे राज्य मार्गावरील तांबडी कोंडजवळील वळणावर पुरातन वडाचे झाड वणव्याच्या आगीत अर्धवट जळून रस्त्यावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
काल सायंकाळी अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर वणवा लावल्याने वडाचे झाड आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मात्र, रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या एफएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने तातडीने जेसीबीच्या मदतीने झाड हटवण्याचे काम सुरू केले. मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या वणव्यामुळे जवळील अन्य वडाच्या झाडांनाही धोका निर्माण झाला असून, तीदेखील रस्त्यावर कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यातील डोंगराळ भागात मागील महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणावर वणवे लागून वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र, महाड वन विभाग या आगी रोखण्यात अपयशी ठरत आहे. आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीवर कारवाई न झाल्याने वन खात्याच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.