महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची धडक कारवाई!; नागपूरचे सह-दुय्यम निबंधक कपले निलंबित — टेबलच्या ड्रॉवरमधून ५ हजारांची रोकड जप्त

मुंबई — महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालयाला दिलेल्या अकस्मात भेटीदरम्यान टेबलच्या ड्रॉवरमध्ये पाच हजार रुपयांची रोकड आढळल्याने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. सह-दुय्यम निबंधक (वर्ग–२) अ.तु. कपले यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले असून, महसूल मंत्र्यांच्या या धडक कारवाईमुळे राज्यातील महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.

६ ऑक्टोबर रोजी मंत्री बावनकुळे यांनी नागपूर शहर क्रमांक ४ येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालयाला प्रभारी सह-जिल्हा निबंधकांसह अचानक भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद सुरू असतानाच, त्यांनी अधिकारी कपले यांच्या टेबलाचा ड्रॉवर उघडून पाहिला असता आत ₹५,००० ची रोकड सापडली.

रोकड सापडताच मंत्री बावनकुळे यांनी कपले यांना विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ती रोकड पंचासमक्ष जप्त केली आणि कपले यांचे म्हणणे नोंदवले. त्याचबरोबर त्या दिवशी नोंदवलेल्या सर्व दस्तांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित व्यवहारांच्या प्रती आणि कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

महसूल मंत्र्यांनी सखोल चौकशी करून तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, चौकशी अहवालात ड्रॉवरमध्ये रक्कम सापडल्याची पुष्टी झाल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अहवालाच्या आधारे कपले यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ चा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत कारवाई करत ९ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या थेट कारवाईनंतर महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात चर्चेची आणि सावधतेची लाट पसरली आहे. अशा प्रकारच्या अचानक छाप्यांची मालिका राज्यातील इतर जिल्ह्यांतही सुरू राहू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात