Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोकणाच्या दृष्टीने मंगळवारी मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र (Betel Nut Research Centre) उभारण्यास कृषी विभागाने मान्यता तर दिलीच, पण यासाठी खास ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यताही दिली.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली व अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या उपस्थितीत २७ सप्टेंबरला यासंदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीत सुपारी संशोधन केंद्र दिवे आगार येथील ५ एकर जागेत उभारण्याबाबत निर्णय कृषी विभागाने घेतला होता.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यादृष्टीने सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी कोकणातील (Konkan) जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी होती. कोकण किनारपट्टीला ७५० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. कोकणात मोठया प्रमाणावर मच्छीमारी केली जाते. प्रामुख्याने या विभागातूनच मोठया प्रमाणावर माशांची निर्यात होऊन मोठया प्रमाणावर देशाला परदेशी चलन मिळते. त्यामुळे कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ व्हावे ही कोकणी जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असतानाही राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सुपारी संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याने हा एकप्रकारे तमाम कोकणी जनतेच्या लढ्याला न्याय दिल्याचे समाधान अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.
या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच अधिक दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवे आगार व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.