X : @NalawadeAnant
मुंबई – मुंबई, कोकण व शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) प्रमूख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही उमेदवार उतरवल्याने कोकण व नाशिक येथे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जाहीर आवाहनच केले. पटोले म्हणाले की, जर या निवडणुकाही आपण एकत्रित लढलो तर लोकसभेप्रमाणे (Lok Sabha elections) याही निवडणूकीत आघाडीला चांगले यश मिळेल.
विधान परिषदेच्या या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी (MVA) म्हणून काँग्रेसचा (Congress) विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशाही पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका (MLC election) होत आहेत. त्यातही विधान परिषदेच्या कोकण पदवीधर (Konkan graduate constituency) व नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून (Nashik Teachers constituency) निवडणूक लढवण्याची भूमिका फार आधीच काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने (Shiv Sena) परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदार संघासाठीचे उमेदवार जाहीर केले. मात्र विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. या अगोदर उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही पटोले यांनी येथे नमूद केले.