X: @therajkaran
पालघर: भिवंडी लोकसभा मतदारसंघात दरवर्षी पंधरा हजार विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा अजेंडा घेऊन मी निवडणुकीला उभा राहिलो आहे. बाँड पेपरवर लिहून देतो, तुमचा उमेदवार समाजाला फसवणार नाही, शंभर टक्के दिवस रात्र समाजाची सेवा करेल, असे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी वाडा येथील सेवा निवृत्ती कर्मचारी व ज्येष्ठ नागरीक महीला बचत गट संवाद सभेदरम्यान आश्वासन दिले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर जिजाऊ विकास पार्टीचे उपाध्यक्ष महेंद्र ठाकरे यांनी शेतकरी संघटनेकडे जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांना सामाजिक बांधिलकी आणि भिवंडी लोकसभा विकासासाठी पाठींबा देण्यात यावा यासाठी पत्र दिले. यावर शेतकरी संघटना यांच्याकडून निलेश सांबरे यांना पाठींबा देण्यात आला आहे, अशी माहिती महेंद्र ठाकरे यांनी दिली.
सांबरे यांना विविध समाज घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. निलेश सांबरे यांनी जनसंपर्क वाढविला आहे. सांबरे समाजकार्याच्या जोरावर निवडणूक लढवत असून त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख ते सभांमधून करतांना दिसतात.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात जिजाऊ संघटनेच्या गाव शाखा 2 हजार 228, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 32 नगरसेवक, 29 सोसायटी चेअरमन, 2 हजार 336 महीला सक्षमीकरण गट, 27 जिजाऊ कामगार संघटना, लेबर युनियन आहेत. पालघर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना सांबरे यांना आपले पद ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गमवावे लागले. अशी राजकीय कारकीर्द व आपल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा सांबरे यांनी परिचयात मांडला आहे.
निलेश सांबरे यांनी वाडा येथील संवाद सभेत कोकणातील कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, आणि कुठलाही नागरिकाला आरोग्याच्या गैरसोयीचा त्रास होऊ नये, हे तुम्हा – आम्हाला आयुष्यभर करायचे आहे, असे नमूद केले.
केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषद योजना मिळतीलच परंतु जिजाऊकडे ज्या योजना शक्य आहेत, त्या योजना ही आपल्यापर्यंत पोहचतीलच, असे आश्वासन दिले.