अंतर्गत कुरघोड्यांचा परिणाम
X: @ajaaysaroj
मुंबई: भिवंडी पूर्व मधील समाजवादी पार्टीचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात वातावरण तापलेले असताना त्यांच्या राजीनाम्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला असून, शेख यांच्या निर्णयामुळे अल्पसंख्याक बांधवां प्रमाणेच, सर्वधर्मीय भिवंडीकरांमध्ये खळबळ उडाली आहे. येथील समाजवादी पक्षात भिवंडीमध्ये उत्तर भारतीय मुस्लिम आणि महाराष्ट्रीयन मुस्लिम असा भेदभाव जाणूनबुजून केला जात असल्याने शेख गेले काही वर्षे नाराज होते. अंतर्गत कुरघोड्या, कंपूशाहीचे राजकारण, याबद्दल त्यांनी अनेकवेळा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. भिवंडी शहर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष रियाझ आझमी मनमानी कारभार करतात, असे आमदार शेख यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. भिवंडीमध्ये, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व ठिकाणी रियाझ आझमी यांना वर्चस्व स्थापन करायचे आहे. त्यासाठी आमदार शेख यांना सातत्याने त्रास दिला जात होता. त्यांनी कुठलेही काम हाती घेतले की त्याला विरोध केला जायचा, असेही आमदार शेख यांचे समर्थक बोलतात.
आमदार शेख यांच्या राजीनाम्याची बातमी समाज माध्यमातून वाऱ्यासारखी भिवंडी आणि आजूबाजूच्या भागात सकाळी पसरली. ही बातमी कळताच, भिवंडी येथील कोणार्क इमारतीमध्ये असलेल्या त्यांच्या कार्यालयाखाली शेख यांच्या सर्वधर्मीय समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या गर्दीत महिलांची संख्या लक्षणीय होती. आमदार शेख यांनी भिवंडीत गोरगरीब जनतेसाठी आणि मुख्यतः महिलावर्गासाठी खूप काम केले असल्याचे बोलले जाते. विधानसभेत त्यांनी भिवंडीच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. शहरातील कचरा समस्या, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाणी समस्येबाबत उपाययोजना करणे अशी अनेक कामे त्यांनी केली असल्याचे येथील नागरिकांशी बोलले असता समजते. अस्खलित मराठीत बोलणे ही त्यांची खासियत असल्याचे येथील मराठी भाषिक मतदार सांगतात. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास संपूर्ण भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, वेळ पडल्यास रास्ता रोको देखील करण्यात येईल, असा इशारा येथे जमलेल्या महिला समर्थकांनी दिला आहे. शेख यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, आमदार शेख म्हणाले की, मी समाजवादी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाने मला आमदार बनवले, लोकांची कामे करण्याची संधी दिली. आपण स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात समाजवादी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहोत, त्यासाठी आपण काही योजना बनवल्या आहेत, त्यासंदर्भात आपण पक्ष नेतृत्वाला वेळोवेळी सांगितले. गेले वर्षभर आपण यासाठी काही मुद्दे मांडत आहोत. आमदारकीचा राजीनामा दिला तरी समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच यापुढेही आपण पक्ष वाढवण्यासाठी, त्याचा विस्तार राज्यभर करण्यासाठीच काम करू. समाजवादी पक्षाच्या दृष्टीने जो योग्य असेल तो निर्णय राज्याचे अध्यक्ष घेतील असा विश्वास मला आहे, असेही आमदार शेख यांनी स्पष्ट केले.