मुंबई – “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली म्हणून भाजप नेत्यांना त्रास होतो. पण त्यांच्या पक्षातील काही नेतेच फडणवीसांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी करत आहेत,” असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. गांधी भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सपकाळ म्हणाले, “राज्यात संतोष देशमुख यांची हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या कार्यशैलीची तुलना औरंगजेबाच्या जुलमी राजवटीशी करण्यात आली. मात्र, त्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यक्तीशी संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सपकाळ यांनी भाजपवर टीका करताना विचारले, “फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोहोचते? पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान झाल्यावर भाजपच्या नेत्यांना मराठी अस्मिता आठवत नाही का?”
त्यांनी पुढे म्हटले, “औरंगजेब क्रूर होता, हे नाकारता येणार नाही. पण इतिहास सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठ्यांनी त्याला पराभूत केले. तसेच ब्रिटिशसुद्धा अत्याचारी होते. मग, त्यांच्या मदतीने उभ्या राहिलेल्या संस्था, स्मारके आणि पुतळे उखडण्याचे धाडस भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद करणार का?” असा थेट सवालही त्यांनी भाजपच्या नेत्यांना केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, “बावनकुळे यांना फडणवीस यांच्या टीकेने मराठी अस्मिता दुखावल्याचे वाटते, पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर ते गप्प का?”
सपकाळ यांनी भाजपवर आणखी आरोप करत म्हटले, “भाजपचे संतोष देशमुख यांची हत्या झाली, तरी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करायला बावनकुळे गेले नाहीत. उलट मांडवली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही काँग्रेसच्या वतीने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि सद्भावना यात्रा काढली.”
त्याच वेळी, भाजप नेत्यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले, “मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. पण बावनकुळे आणि नारायण राणे यांनी माझ्यावर पातळी सोडून टीका केली. यातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.