X : @therajkaran
मुंबई: तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, यामागील वास्तव स्पष्ट होण्यासाठी “मुंबईच्या पाणी प्रश्नावर” श्वेतपत्रिका (White paper on Mumbai’s water crisis) काढावी, अशी मागणी भाजप ज्येष्ठ सदस्य ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. वांद्रे-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे -वर्सोवा सागरी रस्ता या दोन्ही प्रकल्पात नुकसान भरपाईचे निकष वेगळे आहेत, ते समान असावेत, अशी सूचना त्यांनी केली.
विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबईच्या समस्या व विकास या विषयावर नियम -२९३ नुसार प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर आशिष शेलार बोलत म्हणाले, मुंबई शहर आणि उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रचंड तुटवडा मुंबईला जाणवत आहे. महापालिकेतर्फे मुलुंड आणि वांद्रे पश्चिम म्हणजे एच पश्चिम या दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी 400 कोटी रुपये केवळ कन्सल्टंटला देण्यात आले. या प्रकरणांमध्ये कुठला गैरव्यवहार झाला? याची चौकशी करा, अशी मागणीही शेलार यांनी केली.
ते म्हणाले, आघाडी सरकार असताना मेट्रोचे काम दोन वर्ष आरे कारशेडच्या नावावर रोखण्यात आले. ती मेट्रो आता सुरू झाल्यानंतर आठ कोटी लोकांनी प्रवास केला. प्रती दिनी दोन लाख 35 हजार प्रवासी करतात, म्हणजेच उबाठाने एवढ्या सगळ्या मुंबईकरांची अडवणूक करून ठेवली होती, केवळ अहंकारातून आरे कारशेडचे जे काम अडवले होते, त्यामुळे मुंबई मेट्रोचा खर्च 10 हजार कोटी रुपयांनी वाढला. याबाबतही एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.
सुमारे २० लाख रिक्षा टँक्सी असे मिळून काही लाख वाहने मुंबईत आहेत. अनेक वर्षे पालिकेतील सत्ताधाऱ्यांना मुंबईतील पार्किंग समस्येचा प्रश्न कधीच पडला नाही. त्यामुळे आता शासनानेच महापालिकेला सांगून मुंबईचा मेगा पार्किंग प्लॅन तयार करावा, अशी मागणी शेलार यांनी केली.
वांद्रे रेक्लेमेशन (Bandra Reclaimation) येथील एमएसआरडीसीचा भूखंड विकून वांद्रे -वर्सोवा सागरी सेतू पुढे पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या जागेवर आता विविध बांधकाम झाल्यानंतर शिल्लक मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात यावे, अशी सूचनाही शेलार यांनी केली.
विक्रोळी येथे प्रत्यक्ष सुरू झालेले बुलेट ट्रेनचे काम अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक आणि वेळेची बचत करणारे एक अद्भुत असे काम आहे. ही एक बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरू झाली की देशभर हे जाळे विणले जाईल. पण दुर्दैवाने ही बुलेट ट्रेन रोखण्याचे काम उबाठाने केले, असा आरोप शेलार यांनी केला. सागरी सेतूचे काम एमएसआरडीसी करीत असून कोस्टल रोडचे अर्धे काम मुंबई महापालिका करीत आहे. या कामामुळे कोळी बांधवांचे जे नुकसान होते, त्याची मोजदाद करण्याचे निकष समान असावेत, अशी मागणीही आशीष शेलार यांनी केली.