पालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांना प्राधान्य देण्याची मागणी
X : @Rav2Sachin
मुंबई: मुंबई महानगर पालिकेत (BMC) गेल्या कित्येक वर्षापासून कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत २० टक्के जागा पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेले डिप्लोमाधारक अभियंता कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या जागेवर गुणवत्तेनुसार भरती केली जात आहे. आता पुन्हा एकदा महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे या पदांवर पालिकेतील डिप्लोमाधारक अभियंतांची भरती केली जावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
पालिकेत स्थापत्य अभियंता आणि दुय्यम अभियंता तसेच यांत्रिकी आणि विद्युत कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदांसाठी भरती (Recruitment of engineers) प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सुरुवातीला ३५२ कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अभियंता पदासाठी भरती होणार असल्याने पालिकेतील डिप्लोमाधारक अभियंता कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता पदासाठी आम्हाला संधी द्यावी, अशी पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेत २००९ ते २०१८ पर्यंत कनिष्ठ अभियंता पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत पालिकेतील डिप्लोमाधारक अभियंता कर्मचाऱ्यांना सामावून
घेताना त्यांना २० टक्के राखीव जागेचे निकष लावण्यात आले होते. तसेच कोणतीही परीक्षा न घेता गुणवत्तेनुसार त्यांना कनिष्ठ अभियंता पद देण्यात आले होते.
आता पुन्हा कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया राबवताना पालिकेतील अभियंता डिप्लोमाधारक कर्मचाऱ्यांना संधी देण्यात यावी. त्यांच्याकरीता राखीव असलेल्या २० टक्के जागेवर समावून घेताना परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (AMC Ashwini Bhide) यांच्याेसोबत बैठक झाली असून लवकरच यावर सकारात्मक तोडगा नक्कीच निघेल, अशी आशा पालिकेतील अभियंता डिप्लोमाधारक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.