मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर (पूर्व) विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग शाह यांनी नागरिकांच्या सोयीसाठी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती, तीच व्यवस्था आगामी महापालिका निवडणुकीतही कायम ठेवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शाह यांनी म्हटले की, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि जास्त मतदारसंख्या असलेल्या इमारतींमध्ये मतदान केंद्रे ठेवण्यात आल्याने मतदारांना मोठी सुविधा मिळाली आणि मतदानाचा टक्का वाढला. पूर्वी मतदान केंद्रे मुख्यत्वे महापालिका किंवा राज्य शासनाच्या शाळा, बालवाडी, समाजकल्याण केंद्रे अशा ठिकाणी असत, ज्यामुळे जेष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी व सर्वसामान्य मतदारांना मतदानासाठी पोहोचणे अवघड जात असे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत या स्थितीत सुधारणा करताना सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उघडल्याने नागरिकांचा मतदानाकडे अधिक कल झाला. घाटकोपर (पूर्व) मध्ये लोकसभा निवडणुकीत जिथे 40 मतदान केंद्रे होती, तिथे विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढून 68 झाली. यामुळे नागरिकांनी उत्साहात मतदान केल्याचे शाह यांनी सांगितले.
मात्र, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा जुन्या पद्धतीनुसार मतदान केंद्रे ठेवण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पराग शाह यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, जुन्या पद्धतीचा अवलंब केल्यास मतदारांना पुन्हा अडचणींना सामोरे जावे लागेल आणि मतदान टक्केवारी घटण्याची शक्यता आहे.
“लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवायचा असेल, तर सोयीची मतदान केंद्रे देणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे,” असे शाह यांनी स्पष्ट केले. त्यांनी निवडणूक आयोगाला महापालिका निवडणुकीतही सोसायट्यांमधील व गृहसंकुलातील मतदान केंद्रे कायम ठेवण्याची विनंती केली.

