मुंबई: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या नॅनो खत खरेदीतील कथित घोटाळ्याच्या आरोपांना खोडून काढले आहे. मुंडे यांनी स्पष्ट केले की, नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, आणि कापूस साठवणुकीच्या बॅग यांची खरेदी शासनाच्या नियमांनुसार, मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच करण्यात आली आहे.
मुंडे म्हणाले, “नॅनो खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि उत्पादन खर्च कमी होतो, तसेच उत्पन्नात वाढ होते. इफको कंपनीचे दर संपूर्ण भारतात सारखेच आहेत, त्यामुळे दरांमध्ये तफावत असल्याचे आरोप अज्ञानाचे लक्षण आहे.”
फवारणी पंपांच्या खरेदीबाबत ते म्हणाले, “निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक रीतीने राबवून, एक वर्षाची वॉरंटी आणि दुरुस्तीची जबाबदारी कंपनीकडे ठेवण्यात आली आहे.”
कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीबाबत मुंडे यांनी स्पष्ट केले की, “कापसाचे भाव पडल्याने शेतकरी कापूस विकत नव्हते, ज्यामुळे कापूस साठवण्यासाठी बॅगांची मागणी होती. या बॅगांची खरेदी केंद्र सरकारच्या कंपनीकडून प्रमाणित दरानेच करण्यात आली आहे.”
अंजली दमानिया यांच्या आरोपांवर टीका करताना मुंडे म्हणाले, “त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, परंतु त्यात पुढे काय झाले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा.”
ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपांबाबत मुंडे यांनी सांगितले की, “व्यंकटेश्वरा कंपनी महाजनकोकडून एक रुपयाही कमवत नाही. राखेच्या व्यवस्थापनामुळे आमच्या भागात सिमेंट कंपनी आली आणि रोजगार मिळाले.”
मुंडे यांनी निष्कर्षात म्हटले, “खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे आणि बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा.”