उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत तात्पुरते पर्यायी उपाय राबवले जातील, तर धरण पूर्ण झाल्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
ही लक्षवेधी सूचना सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती. उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.” सध्या ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून मुंब्रा, कौसा आणि कळवा भागात दररोज 130.50 दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा केला जातो.
पाणीपुरवठ्याचा दाब सुधारण्यासाठी ६ नवीन जलकुंभ उभारण्यात येत आहेत, त्यापैकी २ कार्यान्वित झाले असून उर्वरित ४ जलकुंभांसाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच, रिमोल्डिंग प्रकल्पाअंतर्गत २४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ठाणेकरांसाठी पाणीपुरवठ्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागासाठी ५० MLD पाणी, तर संपूर्ण ठाणे महापालिकेसाठी १०० MLD पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. यावर कार्यवाहीचे आदेश MIDC ला देण्यात आले आहेत. बारवी धरणातून अतिरिक्त ५० MLD पाणी मिळावे, यासाठी MIDC कडे मागणी करण्यात आली आहे. विटावा भागात रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. तो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील.
अवैध नळजोडणीविरोधात कठोर कारवाई करण्याचे शिंदे यांनी जाहीर केले. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळजोडणी घेतली असल्यास, तत्काळ चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही शिंदे यांनी दिला.
लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य रईस शेख आणि दिलीप लांडे यांनीही सहभाग घेतला.