कमी दराने गाळेविक्री, कर्जव्यवहार आणि ब्रोकरेजवरून विकासकाची तक्रार
मुंबई : चेंबूरमधील शिवाजी नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी पाच जणांसह अन्य मध्यस्थ व दलालांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रकल्पातील व्यावसायिक गाळ्यांची कमी दराने विक्री करणे, थेट गुंतवणुकीऐवजी व्याजाच्या कर्जाचा बोजा निर्माण करणे आणि ब्रोकरेज व कंत्राटी देयकांतून नुकसान केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२६ रोजी एफआयआर क्रमांक १२६९/२०२६ नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१६(५) आणि ३(५) अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. एफआयआरमध्ये ट्रस्ट कॅपिटलचे दर्शन रिंगशिया, मिजीट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे जीत भराणी व मिहीर भराणी, अल्टो ट्रेडिंग एलएलपीचे विमल निसार आणि एम स्पेस रियल्टीचे वरुण पंकज मेहता यांची नावे नमूद आहेत. अन्य मध्यस्थ, दलाल आणि व्यक्तींचाही तक्रारीत उल्लेख आहे.
खार पश्चिम येथे राहणारे ६८ वर्षीय विकासक सुरेंद्र कुमार संपतराज सुराणा यांनी ही तक्रार दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे यापूर्वी दिलेल्या तक्रारीवरील प्राथमिक चौकशीच्या निष्कर्षानुसार चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी आपण जबाब देत असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सुराणा यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीने चेंबूर पश्चिम येथील एस. जे. बर्वे मार्गावरील शिवाजी नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सीटीएस क्रमांक ३८५ या भूखंडाच्या पुनर्विकासासाठी २००६ मध्ये परवानग्या मिळवल्या. प्रत्यक्ष बांधकामाला २५ नोव्हेंबर २०१० रोजी सुरुवात झाली. निधीअभावी २०१८ मध्ये डीएचएफएलकडून ३५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्यात आले; त्यापैकी १६ कोटी रुपये वितरित झाले, असे तक्रारीत नमूद आहे. पुढे कर्जफेड आणि उर्वरित बांधकामासाठी निधीची गरज निर्माण झाल्यानंतर दर्शन रिंगशिया यांच्या माध्यमातून निधी उभारणीची चर्चा झाली. मिजीट व्हेंचर्सची प्रकल्पाच्या ‘डेव्हलपमेंट मॅनेजर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. या व्यवस्थेत प्रकल्पासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणे आणि उर्वरित काम पूर्ण करणे अपेक्षित होते, असे सुराणा यांनी म्हटले आहे.
तक्रारीतील प्रमुख आरोपानुसार, प्रकल्पातील २२,९८१ चौरस फूट व्यावसायिक क्षेत्र अल्टो ट्रेडिंग एलएलपीला कमी दराने विकण्यात आले. व्यावसायिक गाळ्यांसाठी प्रतिचौरस फूट २२,५०० रुपयांचा दर अपेक्षित असताना १८,५०० आणि २०,७०० रुपये दराने विक्री करण्यास भाग पाडल्याचा सुराणा यांचा आरोप आहे. या व्यवहाराशी संबंधित तीन कोटी रुपयांची रोख रक्कम रिंगशिया यांनी स्वतः स्वीकारल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. जानेवारी २०२६ मध्ये १२ ग्राहकांकडून प्रकल्पात थेट येऊ शकणारी २७ कोटी रुपयांची गुंतवणूक ट्रस्ट कॅपिटलमार्फत कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात आली, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे प्रकल्पावर वार्षिक १६ टक्के व्याजाचा बोजा पडला आणि सुमारे साडेतीन कोटी रुपये व्याजापोटी नुकसान झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या निधी उभारणीसाठी एम स्पेस रियल्टीला ८१ लाख रुपये ब्रोकरेज दिल्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला आहे. याशिवाय, कंत्राटदारांच्या बिलांतील रक्कम आणि प्रत्यक्ष झालेल्या कामात तफावत असून अंदाजे ५० लाख रुपये जादा अदा झाल्याचा आरोप तक्रारीत आहे. या सर्व व्यवहारांतून संगनमताने सुमारे १४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे सुराणा यांनी म्हटले आहे.
एफआयआरमध्ये कथित गुन्ह्याचा कालावधी २७ फेब्रुवारी २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२६ असा नमूद आहे. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे यांचे नाव नोंदवले आहे. हे आरोप तक्रारदाराच्या जबाबावर आधारित असून त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

