Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच या मागणीला आता विरोध सुरू झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ तसेच कुणबी सेनेची विरोधाची भूमिका या निमित्ताने समोर आली आहे.
मराठा आरक्षणावर जालना येथील आंदोलन अधिक तीव्र झाले असताना आंदोलकांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी मागणी केली आहे. यावर राज्य सरकारनेही महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची समिती गठीत केली असून समिती एक महिन्यात अहवाल देणार आहे. मात्र या प्रक्रियेला ओबीसी समाजातूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे.
या विषयी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकार कुणबी प्रमाणपत्र देत असेल, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का? ते स्पष्ट झाले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत असाल, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. टक्का वाढवून देत नसाल, तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.
आंदोलकांची मूळ मागणी कुणबी जात प्रमाणपत्राची आहे. ओबीसींचे आरक्षण न वाढवता प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाल्यास काय करणार? असा प्रश्न विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जनतेत गैरसमज नको. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचे काम सरकारने करू नये. एकीकडे सरकार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वेगळी भूमिका घेतात. हे म्हणजे लोकांना फसवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे नुकसान होऊ नये, असे स्पष्ट मतही वडेट्टीवार मांडले.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओबीसींमध्ये ५२ टक्के लोक येतात आणि फक्त २७ टक्के ओबीसी आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून द्यावा. सरकार आरक्षण वाढवून देत असेल, तर माझी काही अडचण नाही, असे भुजबळांनी यावेळी नमूद केले.
कुणबी सेनेचा विरोध
कुणबी सेनेचा मात्र मराठा आरक्षणाला कोणताही विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत असेल तर कुणबी सेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे.
पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून धुमश्चक्री सुरू आहे. या वादामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. ओबीसी समूहात ३०० हून अधिक जाती आहेत. त्यात कुणबी समाजाला न्याय मिळत नाही. पेसा सारख्या कायद्यामुळे आमचे आरक्षण शून्यावर आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे कुणबी प्रमाणपत्रावर, ओबीसी कोट्यातून दिले जात असेल तर कुणबी सेना रस्त्यावर उतरेल, असाही इशारा पाटील यांनी दिला.