मुंबई
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढले आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं नाव नसल्याचं सांगितलं जात आहे. छगन भुजबळांना ध्वजारोहणाचा मान नाकारल्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.
याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘दोन वेळा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेल्या ज्येष्ठ ओबीसी मंत्र्याला महायुतीचे सरकार ध्वजारोहणाचा मान देत नाही. महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना केली जात आहे’, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे बळ कमी झालं की, कमी केलं जातंय असा प्रश्न पडतो आहे. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना दिलेली वागणूक स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांना डावलने हे काही नवीन नाही. या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचा वाटेला अशीच वागणूक येणार हे आधीपासूनच स्पष्ट होते.
ओबीसी मंत्री छगन भुजबळांचे सरकार मधील बळ किती आहे, हे आज राज्यातील जनतेला महायुती सरकारने दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारचे ओबीसी प्रेम हे ढोंगी आहे. हे यावरून स्पष्ट होते. भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या शिंदे -फडणवीस – अजित पवार यांच्या महायुती सरकारने भाजपच्या ओबीसी विरोधी विचारांचे अनुकरण करत त्यांच्या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचा किती मान आणि महत्त्व आहे हे यावरून दाखवून दिले, असे खडेबोल वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहेत.