मुंबई : भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आवश्यक शासकीय प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने निर्माण झालेल्या वादावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी राज्यातील भाजपा युती सरकारवर जोरदार टीका केली.
“महाराष्ट्राच्या सुपुत्राचा असा अपमान हा संपूर्ण राज्यासाठी लज्जास्पद आहे. गवई हे केवळ आंबेडकरी विचारसरणीचे असल्यामुळेच त्यांच्याशी भेदभाव झाला का?” असा थेट सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, “राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश अशा पदाधिकाऱ्यांचा दौरा हा नियोजित असतो आणि त्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. मात्र या दौऱ्याची माहिती नव्हती, असे सांगणारे अधिकारी खोटे बोलत आहेत. हा अपमान केवळ प्रशासनाची चूक नसून सरकारच्या मानसिकतेचा परिणाम आहे.”
“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, एका आंबेडकरी विचारसरणीच्या व्यक्तीचा असा अवमान सहन करता येणार नाही. राज्यात अनुभवी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतानाही या प्रकाराचे गांभीर्य का घेतले गेले नाही?” असा रोखठोक सवालही पटोले यांनी केला.
याशिवाय, ‘फुले’ या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. “सरकार जर सर्वधर्म समभाव मानत असेल, तर महात्मा फुल्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटावर करमाफी जाहीर करावी. इतर अनेक चित्रपटांना करसवलत दिली जाते, मग ‘फुले’ला का नाही?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी सरकारची भूमिका प्रश्नार्थक ठरवली.