मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ लवकरच आणण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने आज मंत्रालयात परिवहन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “एकात्मिक पार्किंग धोरण राबवण्याआधी, स्थानिक अडचणी आणि यंत्रणांमधील त्रुटी समजून घेणे आवश्यक आहे. वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर ती स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी महापालिका क्षेत्रांमध्ये पार्किंग जागा विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आवश्यक आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रारंभी धोरणाची अंमलबजावणी एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांमध्ये करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत महापालिका आयुक्तांनी पार्किंगच्या समस्यांबाबत दिलेले अभिप्राय आणि सूचना या आगामी धोरणात समाविष्ट केल्या जातील, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेचा आदर्श
पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली वाहनतळ उभारण्याची योजना आखावी. ठाणे महापालिकेने मैदानाखाली विकसित केलेले वाहनतळ हे या दृष्टीने उत्तम उदाहरण आहे. याशिवाय रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस आणि मोटार वाहन विभागाच्या सहकार्याने प्रभावी कारवाई करावी.”
ते पुढे म्हणाले, “रस्त्यांवर अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवावी. तसेच विकास आणि सुविधा यासाठी आरक्षित असलेल्या जागांवर पार्किंग प्लाझा उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर महापालिकांनीही स्वीकारावे, जेणेकरून भविष्यात शहरांची पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.”