रांची
झारखंड विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात मुख्यमंत्री चंपाई सोरेन सरकारने स्वत:ला सिद्ध केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावावर घेतलेल्या मतदानात झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीला 47 मतं मिळाली, तर प्रस्तावाच्या विरोधात 29 मतं पडली आहेत.
चंपाई सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, मी अश्रू ढाळणार नाही. झारखंडमध्ये कोणत्याही आदिवासी मुख्यमंत्र्याने 5 वर्षे पूर्ण करावीत अशी भाजपची इच्छा नाही, त्यांनी आपल्या राजवटीत कोणालाही तसं करू दिलं नाही. ते पुढे म्हणाले, आज ईडीने माझ्याविरोधात कारवाई केली याचं मला दु:ख नाही. झारखंडचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा निघाला असून जो कोणी वाईट नजरेने पाहिल त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.
झामुमो आणि युतीचे आमदार रविवारी संध्याकाळी हैदराबादहून विशेष विमानाने रांचीला पोहोचले होते. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पास होण्याचा विश्वास सर्व आमदारांनी व्यक्त केला होता. झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांनी आमचे सर्व आमदार एकजूट असल्याचे म्हटले होते, त्यांनी 48 ते 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, झामुमोला 47 मतं पडली आहेत. झामुमोचे आमदार मिथिलेश ठाकूर यांनी देखील झामुमोच्या नेतृत्वात आघाडी हा विश्वासदर्शक ठराव जिंकेल. याशिवाय राज्यातील भाजपचे अनेक आमदारही युतीला पाठिंबा देत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
 
								 
                                 
                         
                            
