X : @NalawadeAnant
मुंबई – मुंबई, ठाणे आणि पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबई तासभराच्या पावसातच पाण्याखाली जाऊन ठप्प झाली. यात नागरिकांचे मोठे हाल झाले. मात्र, राज्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत, असे सांगत उध्दव ठाकरे यांच्या सेनेचे नेते, युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जबाबदार धरत थेट त्यांच्यावरच निशाणा साधला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रद्द झालेल्या पुणे दौऱ्यावरूनही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
मातोश्री निवासस्थानी गुरूवारी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई, ठाणे आणि पुण्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोलमडून पडली. त्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र अद्यापही राज्यकर्त्यांनी यावर खुलासा केलेला नाही. मुंबईत तीन तास पाऊस पडला असला तरी पहिल्या एका तासांतच शहर आणि उपनगर पाण्याखाली गेले. २००६ मध्ये ढगफुटी झाली होती. त्यावेळी सलग नऊ तास पाऊस पडला होता. परंतु, काल पहिल्यांदाच पश्चिम द्रुतगती मार्ग पाण्याखाली गेला. नवीन बांधलेल्या मेट्रो स्टेशनला गळती लागली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मुंबई महापालिकेत आमची सत्ता असताना आपत्कालीन काळात सुरू केलेले ट्विटर हँडल तातडीने मदत करायच्या. मात्र बुधवारी झालेल्या पावसात त्या कुठेही दिसल्या नाहीत. मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील पालकमंत्री एक बिल्डर आणि दुसरे सतत फिरणारे पाऊस झाल्यानंतर कुठे गायब होते, असा सवालही आदित्य यांनी लोढा आणि केसरकर यांचे नाव न घेता उपस्थित केला. याला कारण राज्यात सरकार स्थापन केल्यापासून फक्त कॉन्ट्रॅक्टर, पैसे आणि खोके यालाच प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केला.
एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मुंबई खड्डेमुक्त करणार, ही जुनीच टेप वाजवली. मात्र आता त्यांच्या राजवटीलाही जवळपास अडीच वर्षे झाली. परंतु, अजूनही रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत. कुठूनही अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम झालेले नाही, असाही आरोप आदित्य यांनी केला. दरम्यान, उलट प्रश्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पावसाने आर्ध्या तासात पोलखोल केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधानांनी पुणे दौरा रद्द केला खरा, पण सामान्यांना जो त्रास झाला त्याचे काय ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपलाही खोचक टोला लगावला.
कंत्राटदारांची टोळी काम करतात
मुंबई, पुणे, ठाणेसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत गेल्या दोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. आता महापौर नाहीत, नगरसेवक नाहीत. मग नागरिकांनी कोणाकडे जायचे? निवडणूका न झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमांतून मुख्यमंत्री चालवत आहेत. नगर विकास विभाग देखील त्यांच्याकडे असून त्याही विभागात काही खास टोळ्याच काम करत असून प्रत्येक गोष्ट ठरवून दिलेली आहे. त्यात रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे? इमारतीचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे? या कॉन्ट्रॅक्टर्सना कोणी सांभाळायचे? हे सगळं ठरलेले आहे. यांनी प्रत्येक कामात घोटाळाच केलेला आहे. कुठेही काम झालेले नाही. एवढे अकार्यक्षम आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्रानेच काय किंबहुना देशाने ही कधी पाहिलेले नसतील, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. त्याचवेळी मुंबईत १५ वॉर्डमध्ये मागील दोन वर्षांत साधे विभाग अधिकारी नेमलेले नाहीत, असे सांगत त्यांनी यासाठी थेट मुख्यमंत्र्याच जबाबदार धरले.
महाराजांचा पुतळा कमकुवत
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत झालेल्या खर्चापेक्षा उत्सव मूर्तीवर जास्त खर्च झाला होता. भाजपने गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी मजबूत बांधला. मग महाराष्ट्रातच महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ? असा परखड सवाल आदित्य यांनी केला. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, त्यावेळी तातडीने पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार आणि दुर्लक्षिततेची चौकशी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.