महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सांस्कृतिक मंत्र्यांचे आवाहन 

X : @NalawadeAnant

मुंबई – आमचे सरकार नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

ते म्हणाले, मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा १५० एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करण्यात येणार आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानगीसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार असून राज्यात ७५ नवीन चित्रनाट्यगृहेही बनविण्यात येणार आहेत. तसेच नरिमन पाँईट येथेही मराठी चित्रपटगृह उभारण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

दादासाहेव फाळके चित्रनगरी (filmcity) च्या ४७ व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाने आजच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन आज केले होते. अ, ब आणि क या तीन श्रेणीत मोडणाऱ्या दर्जेदार चित्रपटांना हे अर्थसहाय्य  देण्यात आले. या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, निर्मात्यांना जिथे चित्रीकरण करायचे असेल तिथे त्यांना निशुल्क चित्रीकरण करता येणार आहे. उत्तम चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहेनत घेतलेली असते, कधी यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते, त्यामुळे खचून जायचे नसते. कारण दादासाहेब फाळके यांनीच चित्रपट सृष्टीची सुरुवात केली. दादा कोंडकेसारख्या साध्या माणसाचे सगळे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. तर रजनीकांत या मराठी अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर दक्षिणेत सर्वांची मने जिंकली. त्यांचा आदर्श मराठी चित्रपटसृष्टीने समोर ठेवावा, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

मुनगंटीवार म्हणाले, दर्जेदार चित्रपट निर्मात्यांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी हा फक्त प्रयत्न असून हा धनादेश नाही, तर महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या शुभेच्छा आहेत. परंतू माझी अशी अपेक्षा आहे की मराठी चित्रपटसृष्टीने अजून प्रगती करावी. जसे दक्षिणात्य भाषेचे चित्रपट मराठीमध्ये डबिंग करून दाखवले जातात, तसे भविष्यात मराठी चित्रपट दक्षिणात्य व अन्य भाषेमध्ये डबिंग करून दाखवले गेले पाहिजेत. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीने सातासमुद्रापार जागतिक झेप घ्यावी, अशी सर्व मराठी जनतेची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. भारतीय चित्रपटसृष्टीचा संस्थापकच मराठी होता आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहुर्तमेठ या महाराष्ट्रातच रोवली गेली होती, याची आठवण करून देतांना मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.

यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच अ दर्जा प्राप्त असलेल्या महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांना पाच लाख रुपये धनादेशचे वितरण करण्यात आले. ‘तिचं शहर होणे ‘ या चित्रपटासाठी रसिका आगाशे, येरे येरे पावसासाठी शफक खान, बटरफ्लाय साठी मीरा वेलणकर, गिरकी या चित्रपटासाठी कविता दातीर यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वाळवी चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्यात आले. या कार्यक्रमात ७७ अ व ब वर्ग दर्जाच्या  तसेच प्रथमच समावेश केलेल्या क वर्गाच्या २१ चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी २२ लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात