नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. “आमचं हे सरकार कंटिन्यूएशन सरकार आहे. ज्या योजना सुरू केल्या त्या पूर्णत्वास नेणार. पलिकडच्या बाजूला असताना जे बोलत होतो ते सर्व प्रत्यक्षात आणणार,” असा संकल्प व्यक्त करत फडणवीस यांनी वैनगंगा-पैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. हा प्रकल्प ८४ हजार कोटींचा असून, पहिलं टेंडरही निघालं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विरोधकांना टोला – “२०-२० खेळलो आणि विश्वचषक जिंकलो”
विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, “अडीच वर्ष तुमचं सरकार होतं, २०-२० खेळावी लागेल याची कल्पना होती. जोरदार बॅटिंग केली आणि विश्वचषकच जिंकला,” असा टोला त्यांनी लगावला.
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष प्रकल्प
फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकास योजनांना प्राधान्य देईल. मराठवाड्यासाठी ३४ मोठे प्रकल्प राबवले जात असून, ७२ हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे दोन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. गोसीखूर्द प्रकल्पाच्या माध्यमातून ५५० किमी लांबीची नवीन नदी तयार होणार असून, भविष्यातील औद्योगिक प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जाईल.
बळीराजा योजना आणि गडचिरोली विकासावर भर
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, बळीराजा स्वतंत्र योजना अंतर्गत ११० प्रकल्प हाती घेतले असून, केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून २५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. विदर्भात ६९ प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत.
गडचिरोलीतील विकासावर बोलताना त्यांनी सांगितले की, खनिज खोदकाम आणि स्टील प्रकल्पांच्या माध्यमातून गडचिरोलीत स्टील सिटी उभी केली जात आहे. आतापर्यंत या क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्या भागात विमानतळासह ४७ मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
नक्षलवादावर नियंत्रण आणि भरती
फडणवीस म्हणाले की, नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण सुरू असून, १५०० युवक पोलीस दलात भरती झाले आहेत. त्यामुळे गडचिरोली नक्षलवादमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पिक विमा घोटाळ्यावर चौकशीचे आदेश
विधानसभेत सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील पिक विमा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “हा करदात्यांचा पैसा आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू,” असे आश्वासन दिले.