मुंबई: परभणी प्रकरणी महिला आयोग, एससी, एसटी आयोग, आणि मानवाधिकार आयोग यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देऊन, संबंधित अधिकार्यांनी योग्य माहिती दिली का, याची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यात तथ्य आहे. त्यांनी माझ्या विनंतीनुसार 14-15 वर्षांच्या मुलींना सोडण्याची, पोलिसांचा लाठीमार थांबवण्याची आणि कोंबिंग ऑपरेशन बंद करण्याची कार्यवाही केली,” असे आंबेडकर यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले की, “आय.जी आणि एस.पी यांनी कोंबिंग ऑपरेशन झाल्याचे नाकारले आहे, परंतु प्रत्यक्षात घरं तोडणे, घरात घुसून मारहाण, बाळंतीण महिलेला मारहाण अशा घटना घडल्या आहेत. याची चौकशी आय.जी किंवा एस.पी कडून न करता स्वतंत्र समितीमार्फत केली जावी.”
पीडितांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी करत आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यावर तत्काळ पावलं उचलावी.