मुंबई
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन (Ganesh immersion) आणि ईद ए मिलादचा (Eid-e-Milad) सण एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी (२८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे, म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला.
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या (All India Khilafat Committee) शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यातही प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे यासंदर्भात विनंती करत शुक्रवारी शासकीय सुट्टीची मागणी केली होती. त्याला आज मुख्यमंत्री शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय सुट्टी म्हणून घोषणा केली.

राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale), आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi), आमदार रईस खान (MLA Raees Khan), नसीम खान आदींचा समावेश होता.
अनंत चतुर्दशी निमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलाद निमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात
अनंत चतुर्दशी निमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना यावेळी केले.
गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा-दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली, तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला, त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनीही समाधान व्यक्त केले.
उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.