नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत भाजप आमदारांकडून वारंवार “लाडकी बहीण योजनेचा” उल्लेख होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांसह सर्वच सदस्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, “लाडक्या बहिणींना विरोध करू नका… अन्यथा घरी बसावे लागेल.”
सभागृहात या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या योजनेची तुलना कुठल्याही विषयाशी करणं चुकीचे आहे, योजनेचा निधी थांबवला जाणार नाही, राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा थेट लाभ होतो आहे, योजनेबाबत संभ्रम निर्माण करणे “अयोग्य व दिशाभूल करणारे” आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांनी निराधार योजनेचा निधी कमी केल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, निराधार योजनेचे पैसे अडवलेले नाहीत, केवळ KYC पूर्ण नसल्यामुळे सुमारे १०% लाभार्थ्यांचे पैसे रोखले गेले होते, ही अडचण दूर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या आमदार अॅड. ज्योती गायकवाड यांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. विविध महिला सदस्यांनीही चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी ठोस डिजिटल व फोरेन्सिक पुरावे मिळाले आहेत. त्याबाबत लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, महिला IPS अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे, या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, महिला सुरक्षितता महत्त्वाची, पण तिचा लाडकी बहीण योजनेशी संबंध जोडू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैध दारू विक्रीच्या प्रश्नात “लाडक्या बहिणींचे दुःख” अशी टिप्पणी केली.
यावर मुख्यमंत्री संतापले आणि म्हणाले, “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण योजना आणू नका. विरोध केला तर राजकीय किंमत चुकवावी लागेल.”
त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केले की, अवैध दारू विक्रीविरोधात मोहीम सुरू आहे, आवश्यक ती कारवाई सातत्याने सुरू राहील.
महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या “शक्ती कायदा”बाबत काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्राच्या तीन नव्या कायद्यांमध्ये शक्ती कायद्यातील काही तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र–राज्य अधिकार मर्यादा लक्षात घेऊनच राज्याने संबंधित कागदपत्रे परत पाठवली आहेत.

