मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालीम, प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेतून नवे उदयोन्मुख कलाकार उदयाला येतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
राज्यात काही नामांकित संस्थांद्वारे एकांकिका स्पर्धा घेतल्या जातात. तर राज्य सरकारतर्फे राज्य स्तरावरील मराठी, संगीत, हिंदी, संस्कृत, बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांच्या धर्तीवर यंदापासून महाविद्यालयीन तरुणांमधील कलेला उत्तेजन देण्यासाठी मराठी एकांकिका स्पर्धा भरविली जाणार आहे.
अंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकेला गुणानुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट बोलीभाषा एकांकिकेसाठी ५० हजार रुपयांचे प्रथम बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, अभिनय अशी बक्षीसेही दिली जाणार आहेत.
तीन फेरीमध्ये होणार स्पर्धा
तीन फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३६ केंद्रांवर तालीम फेरी पार पडेल. तालीम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिकेची प्राथमिक फेरीत निवड होईल. या निवड झालेल्या संघांना एकांकिकेच्या तयारीसाठी दहा हजार रुपये नाट्य निर्मिती खर्च दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सहा महसूली विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक फेरी होणार आहे. तर मुंबईत अंतिम फेरी संपन्न होईल.
या स्पर्धेचे नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय या विभागामार्फत करण्यात येणार आहे. आज विभागाची अर्थसंकल्पीय आढावा बैठकीत या विषयाच्या आर्थिक तरतूद व नियोजनाबाबत मंत्री आशिष शेलार यांनी चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. लवकरच या स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या जातील असे ही त्यांनी सांगितले.