मुंबई : राज्यातील तसेच सीमावर्ती भागातील गरजू नागरिकांना आरोग्यविषयक मदत तातडीने आणि सुलभपणे मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत सीमावर्ती गावांपर्यंत अधिक सुलभरित्या पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय मदत प्रमुख आनंद आपटेकर यांनी गुरुवारी मंत्रालयात कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. सीमावर्ती भागातील नागरिकांना वैद्यकीय सहाय्यता जलदगतीने आणि अधिक प्रभावीपणे मिळावी यासाठी त्यांनी विनंती केली. यावेळी, सद्यस्थितीत देण्यात येणाऱ्या मदतीबाबत समाधान व्यक्त करत सीमा भागातील रुग्णांना तत्काळ आणि सुलभ मदत मिळण्यासाठी अधिक कार्यक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
सहाय्यता निधी अधिक प्रभावी करण्यासाठी नवे निर्णय
पत्रकारांशी संवाद साधताना रामेश्वर नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना पारदर्शक आणि तातडीने मदत मिळावी यासाठी नवीन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये –
• आजारांचे पुनर्विलोकन आणि आर्थिक सहाय्याची नव्याने निश्चिती
• रुग्णालय संलग्नीकरणासाठी विशेष समिती गठीत
• शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू
सीमा भागातील रुग्णालयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न होण्यासाठी अर्ज केले असल्यास, त्याबाबत प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी नव्या रुग्णालयांचे संलग्नीकरण करण्याचे कामही हाती घेतले आहे.
सीमा भागात विशेष मोहिम आणि हेल्पलाइन सेवा
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या नवीन कार्यपद्धतीची माहिती सीमा भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच विशेष मोहिम राबवली जाणार आहे. तसेच, निधी वितरण अधिक प्रभावी आणि सुलभ होईल, असा ठाम विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
सीमा भागातील गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिरेही राबवली जात असून, या पुढाकारामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये दिलासा मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अधिक माहिती मिळवण्यासाठी ९३२११०३१०३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही रामेश्वर नाईक यांनी केले.